Sunday, August 17, 2014

ईश्वरइच्छेचा अवमान



बेंजामिन फ्रँकलिनने जेव्हा इमारतींवर वीज पडण्याचा धोका टाळण्यासाठी विद्युत अवरोधकाचा (lightening rod) शोध लावला, तेव्हा इंग्लंड आणि अमेरिकेतील धर्मगुरुंनी त्याचा धिक्कार केला. त्यांचे असे म्हणणे होते, की हा शोध म्हणजे ईश्वरी इच्छेचा अवमान करण्याचा गर्हणीय प्रयत्न होयया धर्मगुरुंना राजा तिसरा जॉर्जची अगदी सक्रीय फूस होती. त्या काळच्या सर्व `विचारी, सुसंस्कृत लोकांना ठाऊक होते, की वीज पडणे ही ईश्वरइच्छेचा अवमान किंवा तत्सम महाभयंकर पापकृत्य केल्याबद्दल ईश्वरानेच दिलेली शिक्षा असते. त्यामुळे एखाद्याला विजेचा झटका द्यावा, अशी जर परमेश्वराचीच इच्छा असेल, तर बेंजामिन फ्रँकलिनने ईश्वराचा बेत उधलून लावणे बरोबर नाही. कारण तसे करणे म्हणजे गुन्हेगाराला स्वतःचा बचाव करण्यास मदत करणे होय. 

सत्शील माणसांवर कधीच वीज पडत नाही. पण बोस्टनमधील एक अग्रणी दैवी पुरुष डॉ. प्राईस यांच्या मते ईश्वर बेंजामिन फ्रँकलिनशी सामना करण्यास समर्थ होता. कारण त्या अतिशहाण्या डॉ. फ्रँकलिनने तयार केलेल्या लोखंडी तुकड्यांमुळे आकाशातील वीज निष्प्रभ झाली असेल, पण त्याऐवजी मॅसेच्युसेट्स शहराला भूकंपाचे दणके बसेल. डॉ. प्राईस यांच्या मते फ्रँकलिनच्या लोखंडी तुकड्यांमुळे ओढावलेला तो ईश्वरी कोपच होता. याविषयी एका प्रवचनात ते म्हणाले, ``न्यू इंग्लंडमध्ये सर्वांत जास्त विद्युतरोधक बोस्टन शहारात उभारलेले आहेत. म्हणूनच भूकंपाचे हादरे आपल्या शहराला जास्त बसले. ईश्वराची पकड भक्कम असते. त्यातून सुटका शक्य नाही.’’

मात्र एकंदरीत असे दिसते, की दुर्वर्तनी बोस्टन शहराला सुधारण्याची सर्व आशा त्या परमेश्वराने सोडून दिली आहे. कारण मॅसेच्युसेट्समधील इमारतींवर विद्युतरोधक बसवण्याचे प्रमाण वाढले असले, तरी तेथे भूकंप मात्र क्वचितच होतात. असे असूनही प्राईस यांच्या दृष्टीकोनाशी मिळताजुळता दृष्टीकोन अगदी अलीकडच्या काळातील एक अत्यंत प्रभावशाली व्यक्तीदेखील बाळगून आहे. हिंदुस्थानात जेव्हा एकापाठोपाठ एक मोठे भूकंप झाले, तेव्हा महात्मा गांधींनी आपल्या देशबांधवांना गंभीरपणे सावध केले, की देशवासी जी पापकृत्ये करीत आहेत, त्याची शिक्षा म्हणून देशावर अशा आपत्ती कोसळत आहेत.

माझ्या मायभूमीत- इंग्लंडमध्येही –असा दृष्टीकोन अजून अस्तित्वात आहे.1914-18 या पहिल्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारने देशातील अन्नधान्याचे उत्पादन वाढावे यासाठी खूप प्रयत्न केले. 1916 मध्ये जेव्हा परिस्थिती फारच बिघडली, तेव्हा एका स्कॉटिश धर्मोपदेशकाने वृत्तपत्रांना पुढीलप्रमाणे पत्रे पाठवली- `ब्रिटीश सैन्यदलाला सध्या परायज स्वीकारावा लागत आहे, कारण शेतकऱ्यांनी धार्मिक सुट्टीच्या दिवशी बटाट्यांची लागवड केली, आणि सरकारनेही तसे करण्यास परवानगी दिली. (बायबलमध्ये ख्रिस्ती धर्मीयांनी पाळावयाच्या 10 आज्ञा दिल्या आहेत. त्यातील चौथी आज्ञा आहे.- सातवा दिवस पवित्र म्हणून लक्षात ठेवावा. या दिवशी कोणीही काम करू नये व संपूर्ण दिवस ईश्वरासाठी राखून ठेवावा. हा दिवस पवित्र holy day  मानला जातो. तोच धार्मिक सुटीचा दिवस.) मात्र अंतिमतः आपण महाभयंकर आपत्तीतून बचावलो. कारण आपण दहांपैकी फक्त एकच आज्ञा मोडली. याउलट जर्मनांनी दहाच्या दहा आज्ञांचे उल्लंघन केले.

Unpopular Essays
Bertrand Russell
नाही लोकप्रिय तरी उदारमतवादाची कास धरी
-अनुवाद डॉ. करुणा गोखले
मेनका प्रकाशन, पुणे


No comments:

Post a Comment