Tuesday, August 19, 2014

संघाचा सांगावा


प्रमोद महाजनांचे पंख कापण्याची तयारी लालकृष्ण अडवानींनी केली तेव्हा त्यांची पहिली खेळी संघप्रिय नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद देणे ही होती. ती करताना त्यांनी प्रमोद महाजन यांना विश्वासात घेतले नव्हते. संघाच्या मंडळींचा महाजनांवरील रोष वापरुन घेत त्यांच्या सहानुमतीने त्यांनी गडकरींना प्रदेशाध्यक्षपदावर बसविले. ज्या दिवशी (नोव्हेंबर 2004) तशी घोषणा भाजपच्या केंद्रीय कार्यालयाने केली त्या दिवशी मी दिल्लीत महाजनांसोबत त्यांच्या घरी होतो. महाराष्ट्राचे प्रभारी पद त्यांच्याकडे असतानाही त्या घोषणेच्यावेळी ते पक्ष कार्यालयाकडे फिरकले नव्हते... `मला हा निर्णय आवडणारा नसल्यामुळे मी तेथे जाणार नाही' हे त्यांनीच मला त्या वेळी सांगितले होते.
महाजनांचे माहात्म्य कमी करण्यासाठी संघाच्या मदतीने गडकरींना पुढे रेटण्याचा अडवाणी आणि मंडळींचा तेव्हाचा डाव आता त्यांच्यावरच उलटला आहे आणि संघाने गडकरींना पाठबळ देऊन अडवाणींनाच त्यांच्या साथीसोबत्यांसह राजकारणाच्या मध्यवर्ती पटलावरून बाजूला सारले आहे.


भाजपच्या राजकारणावर संघाचे नुसते नियंत्रणच नाही. ते राजकारणच संघ करीत असतो. गडकरी हे संघाच्या मुख्यालयाशी जेवढे संबंद्ध आहेत तेवढी त्या पक्षातील एकाही नेत्याची संघाशी जवळीक नाही. शिवाय भाजपचा नेता केवढाही वजनदार असला तरी तो आमच्यापुढे दुय्यम आहे ही बाब संघाच्या नेतृत्वाने अटलबिहारी वाजपेयी यांच्या लक्षात ते पंतप्रधान असतानाच आणून दिली होती. (पंतप्रधानपदावर असलेले वाजपेयी पक्षाच्या अधिवेशनासाठी नागपुरात आले असताना त्यांनी संघस्थानाला भेट दिली त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी आपला एकही वरिष्ठ कार्यकर्ता तेथे असणार नाही अशी व्यवस्था संघाने केली होती.) भाजप आणि संघ यांच्या संबंधातले हे वास्तव संघाबाहेरून भाजपात आलेल्याल्यांच्या जसे ध्यानात नाही तसे ते नागपूरहून दूर असणाऱ्यांच्याही लक्षात यायचे राहिले आहे. त्यातही पक्षात संघातून आलेले कोण आणि बाहेरून आलेले कोण याची नेमकी जाण संघाला आहे. सुषमा स्वराज आणि यशवंत सिन्हा, नकवी आणि शहानवाज या `बाहेर'च्यांना या वास्तवाची कल्पना एव्हाना बहुदा आली असावी. या पुढाऱ्यांची उपयुक्तता पक्षाला व संघाला कळत असली तरी त्यांचे `बाहेर' चे स्थान त्यांच्या मनात निश्चित आहे. सुषमाबाई समाजवाद्यांच्या गोटातून  जॉर्ज फर्नांडिसांमुळे पक्षात आल्या तर यशवंत सिन्हा जयप्रकाशांच्या काळात प्रथम जनता पक्षात आणि तेथून भाजपात आले. नकवी-शहनवाज यांना तर संघस्थानावर प्रवेश नाही. गडकरी यांचे नाव पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी संघवर्तुळात चर्चिले जात असल्याची व तेच पक्के होणार असल्याची माहिती संघाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने त्या नियुक्तीच्या काही महिने अगोदर मला सांगितली होती हेही येथे नोंदवण्याजोगे.

गडकरी प्रथम प्रदेशाध्यक्ष झाले व नंतर ठरल्याप्रमाणे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही बनले. त्यांच्या कार्यशैलीचा पहिला फटका  गोपीनाथ मुंडे यांना बसला व मुंड्यांनी पक्षाचे सदस्यत्व वगळता सर्व पदांचे राजीनामे दिले. पुढे पक्षाचे सरचिटणीसपद व लोकसभेतील उपनेतेपद देऊन त्यांचे सांत्वन व पुनर्वसन करण्यात आले तरी त्यांच्या मताला पक्षात महत्त्व नाही ही बाब पक्षाच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांच्या नियुक्त्यांमधून उघड झाली. प्रदेशाध्यक्ष, मुंबई व पुण्याचे शहराध्यक्ष आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद ही सारी पदे  मुंड्यांना नको असलेल्या माणसांना दिली गेली. मुंडे नाराजी बोलून दाखवीत नसले तरी ती सहानुभूतीने समजून घ्यावी अशी आहे.

खरे तर पक्षातील जुन्या वरिष्ठांना त्यांची जागा अशी दाखवून देण्याचा प्रकार सुषमा स्वराज यांच्या पत्रकारांसमोरच झालेल्या पाणउताऱ्याने सुरू झाला. मार्च 2011 मध्ये केंद्रीय दक्षता आयोगाच्या अध्यक्षपदी असलेल्या पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीचा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे सोडवण्यात येईल असे पंतप्रधानांनी मान्य केले तेव्हा `हा लोकशाहीचा विजय असून आमच्यासाठी वाद संपला आहे असे सुषमा स्वराज यांनी लोकसभेत खिलाडूपणे जाहीर केले. मात्र नंतर झालेल्या पक्षाच्या पत्रकार परिषदेत गडकरी यांनी तो प्रश्न जिवंत असल्याचे सांगितले. त्यावर सुषमा स्वराज यांनी तो संपल्याचे म्हटले असल्याची आठवण पत्रकारांनी करून दिली तेव्हा `मी पक्षाचा अध्यक्ष आहे असे सांगून गडकरींनी त्यांना गप्प केले. त्यावेळच्या अश्रूभरल्या डोळ्यांचे सुषमाबाईंचे अपमानित छायाचित्र वृत्तपत्रांनी प्रकाशितही केले... येडीयुरप्पा प्रकरणात पक्षाध्यक्षांनी रेड्डी बंधू आणि येडीयुरप्पा यांना सातत्याने पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. अडवाणी, मुरली मनोहर ही जुनी व ज्येष्ठ माणसे फक्त गप्प राहिली. पुढे पक्षाचे अनेक निर्णय आपल्याला वृत्तपत्रांतून समजतात हे सांगण्याची पाळी पंतप्रधानपदाचे माजी उमेदवार राहिलेल्या अडवाणी या पक्षातील सर्वाधिक वजनदार व ज्येष्ठ नेत्यावर आलेलीची देशाला दिसली.

-सुरेश व्दादशीवार
सेंटर पेज (सोशिओ-पोलिटिकल कॉमेंट्री)

साधना प्रकाशन, पुणे.

No comments:

Post a Comment