शिवसेनेने 1969 मध्ये दाक्षिणात्यांविरुद्ध जोरदार
आंदोलन सुरू केलं होतं. उठाव लुंगी बजाव पुंगी अशी घोषणा दिली होती. डॉ. हेमचंद्र
गुप्ते, मनोहर जोशी आदी मध्य मुंबईतले नेते त्या काळी सर्व भागात फिरत होते. जमाव
पिसाटला होता. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ होत होती. डॉ. गुप्ते यांच्या गाडीचीही
नासघूस झाली होती. चाकूसुऱ्यांचा सर्रास वापर करण्यात येत होता. शेवटी गोळीबार
करून दंगल आटोक्यात आणली गेली. त्या वेळेस सतत तीन दिवस मी झोपलोसुद्धा नव्हतो.
अशातच पांडुरंग शंकर कदम नावाचा बावीस वर्षांचा एक
तरुण मुलगा छातीत गोळी लागल्यामुळे दाखल झाला. मी तातडीनं त्याचं ऑपरेशन केलं.
फुफ्फुस फाटलं होतं. ते शिवलं व छातीत नळी ठेवली. त्याची प्रकृती बरीच चिंताजनक
होती. अठ्ठेचाळीस तासानंतर त्याला वॉर्डमध्ये आणण्यात आलं. रात्री दोन वाजता
हिरव्या लष्करी गणवेशातील व डोक्यावर तुरा असलेली टोपी घातलेला एक फौजी त्याच्या
शेजारी दाखल झाला.
नेहमीप्रमाणे मी सकाळी आलो आणि माझा राऊंड सुरु
झाला. मी त्या तरुणाजवळ गेलो आणि माझ्या नेहमीच्या स्वभावाप्रमाणे त्याला खूप
रागावलो. म्हणालो, ``अरे संघटनेची कामं करायची आहेत तर
जरूर करा; पण ते करताना काही तत्वं वगैरे बाळगायला हवीत का
नकोत? फक्त नुसता आतातायीपणा काय कामाचा? अविचाराने हिंसा
करायची काही गरज होती का? तू असला काही तरी गाढवपणा केलास
म्हणून गोळी लागली तुला.‘’
माझं बोलणं संपत नाही तोच मघाचा मराठा लाईट
इन्फन्ट्रीमधाल सार्जंट उठला आणि म्हणाला, डॉक्टरसाहेब मला तुमच्याशी काही
बोलायचंय. माझा राऊंड संपवून मी माझ्या साहाय्यकाबरोबर साईडरुममध्ये येऊन बसलो.
रुग्णांबद्दल चर्चा करत चहाकॉफी घेतली. माझा साहाय्यक म्हणाला, ``तुम्ही त्या पोरावर रागावलात, फार बरं केलंत सर.’’
मला स्वतःला खाकी वर्दीचा नेहमीच अभिमान वाटत आला
आहे. मी त्या सार्जंटला बोलवलं. तो सांगू लागला, मी राजाराम शंकर कदम. या मुलाचा
मोठा भाऊ आहे साहेब. मराठा लाईट इन्फंट्रीत आहे. सीमेवर पोस्टिंग आहे. 1965 च्या
लढाईत तळहातावर शिर घेऊन लढलो होतो. घरी पैसे पाठवतो. या लहान भावानं चांगलं
शिकावं असं वाटतं. पण हा इकडे असली गुंडागर्दी व मारामारी करत होता हे माहीतच
नव्हतं साहेब. तार आली. याला गोळी लागल्याचं कळसं म्हणून आलोय. कुळाला कलंक
लावणाऱ्या असल्या नादान लोकांना वाचवायचा प्रयत्नसुद्धा करू नका हो. आम्ही घरदार,
संसार सोडून सीमेवर देशाकरता लढतो, याला पैसे पुरत नाहीत म्हणून पैसे धाडतो आणि हा
असा जाळपोळीत आणि विध्वंसात भाग घेतो. मरू दे त्याला.’’
तो सैनिक सतत आपल्या भावाजवळ असायचा. मला त्याच्या
भावना कळत होत्या. मी त्याला एवढंच म्हणालो, `` जाऊ दे रे !
चुका प्रत्येकाच्या हातून होतात. कळेल एक दिवस त्याचं त्यालाच.‘’
पण त्याला काही ते पटलेलं
दिसलं नाही. म्हणाला, ``साब नसीब अपना अपना!‘’ त्यानंतर सुट्टीवर आल्यावर प्रत्येकवेळी तो
सैनिक मला भेटून जायचा. म्हणायचा, ``तुमच्या कृपेमुळे वाचला
माझा भाऊ. आता मार्गी लागतो आहे साहेब. तुम्हीसुद्धा आमच्यासारखेच, आमच्या
जातीचेच. ड्युटी फर्स्टवाले!'’ आता त्याचा चेहरा वगैरे काही
आठवत नाही. पण एक जागतिक सत्य मनावर कोरून गेला- `ड्युटी
फर्स्ट!’ माझा पत्रकार मित्र शशी प्रधान यानं त्याच्यावर एक स्फुट लिहिल्याचंही
आठवतंय मला.
-डॉ. रवी बापट
`वॉर्ड नं. 5 केईएम' या पुस्तकातील उतारा.
रोहन प्रकाशन, पुणे
किंमत - रु. 250

No comments:
Post a Comment